या देशात प्रथम या वयोगटाला मिळणार करोना लस

फोटो साभार कॅच न्यूज

करोना कोविड १९ लसीकरण अनेक देशात सुरु झाले आहे तर अनेक देशात त्याची पूर्वतयारी सुरु झाली आहे. जगातील बहुतेक सर्व देशात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि जेष्ठ नागरिक याना प्रथम लस दिली जाणार आहे. मात्र इंडोनेशिया सरकारने लसीकरणाबाबत वेगळा निर्णय घेतला आहे. या देशात जेष्ठ नागरिकांना प्रथम लस दिली जाणार नाही तर १८ ते ५९ या वयोगटात प्रथम लसीकरण केले जाणार आहे.

कोविड १९ लसीची डिलीव्हरी मिळविणारा दक्षिण पूर्व आशियातील इंडोनेशिया पाहिला देश आहे. त्यांनी चीनकडून लसीचे १२ लाख डोस ६ डिसेंबररोजी मिळविले आहेत आणि अन्य कंपन्यांचे २४६ दशलक्ष डोस खरेदी साठी ऑर्डर दिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मोलेक्युलर बायोलॉजीचे प्रमुख अमीन एबांद्रो म्हणाले आम्ही हर्ड कम्युनिटी हा मुख्य उद्देश ठेवला आहे आणि यामुळे आमच्या लोकसंख्येत सर्वधिक सक्रीय असलेल्या १८ ते ५९ या वयोगटाची लसीकरणासाठी निवड केली आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक आणि या वयोगटाचे लसीकरण केले जाईल आणि नंतर अन्य नागरिकांना लस दिली जाईल.

ब्रिटनने सर्वप्रथम ९१ वर्षीय महिलेला लस देऊन लसीकरण सुरु केले आहे तर अमेरिकेत सुद्धा जेष्ठ नागरिकांना प्रथम लस दिली जाणार आहे.