या दुकानात मिळतो १५० प्रकारचा चहा

फोटो साभार जागरण

चहा हे जगातील असंख्य नागरिकांचे आवडते पेय आहे. चहा कोणत्याही वेळी प्यायला जातो. अनेक प्रकारचे चहा बाजारात मिळतात आणि त्यांची किंमतही वेगळी असते. भारतात चहाची टपरी हे जनतेचे लोकप्रिय आउटिंग स्टेशन म्हणता येईल. कारण कोणत्याही वेळी आणि कुठल्याही ठिकाणी चहा टपरीवर गर्दी दिसणारच.

झारखंड राज्यातील जमशेदपूर जिल्ह्यात सर्किट हाउस जवळ एक अनोखे चहा दुकान आहे. ला ग्रेविटी असे नाव असलेल्या या दुकानात चक्क १५० प्रकारचा चहा मिळतो. केवळ चहाच नाही तर येथे विविध प्रकारची चहा पात्रे म्हणजे कप, किटल्या यांचेही दर्शन होते. जपानच्या जगप्रसिध्द माचा, जपानी फेंचा पासून जगप्रसिद्ध आसाम, दार्जिलिंग चहा येथे चाखता येतो. या चहांच्या किमती ५० रुपयापासून १२५० पर्यंत आहेत.

केवळ आसपासचे नाही तर अगदी दूरवरून सुद्धा चहाचे शौकीन या दुकानात आवर्जून येतात. येथे नेहमीच गर्दी असते. वेगवेगळ्या फ्लेवर मधील चहा येथे सर्व्ह होतो. ५० रुपयांपासून ७५० रुपये कप मिळणारा ग्लुमिंग चहा, आणि ३०० रुपयापासून १२५० रुपयांपर्यंत मिळणारा परिवार स्पेशल पॉट चहा येथे उपलब्ध आहे. हा परिवार स्पेशल चहा विशेष किटल्यातून दिला जातो. या दुकानाचे मालक अविनाश दुग्गड सांगतात, आपल्या देशाच्या मातीचा स्वाद देणारा कुल्हड चहाची खुशबू जगभर फैलवावी अशी त्यांची इच्छा आहे. आणखी एक विशेष म्हणजे या दुकानात ११ कर्मचारी असून ते सर्व मूक बधीर आहेत.

या दुकानात अननस, सफरचंद, आंबा अश्या अनेक फळाच्या स्वादाचा चहा मिळतो तसेच जाफरानी, सुलेमानी, सेलेब्रेशन, व्हाईट अशा नावांचा चहा सुद्धा मिळतो.