बीटकॉईनची गगनझेप, एक युनिटची किंमत १५ लाखांवर

क्रिप्टोकरन्सी बीटकॉईनने या वर्षात रेकॉर्ड नोंदविले असून बुधवारी त्याच्या किमतीत ४.५ टक्क्याने वाढ होऊन त्याचा भाव २०,४४० डॉलर्स म्हणजे चक्क १५ लाख रुपये प्रती युनिटवर गेला. या वर्षात बीटकॉईनच्या किमतीत १७० टक्के वाढ झाली असून त्वरित फायदा मिळावा यासाठी मोठे गुंतवणूकदार बीटकॉईनला पसंती देत आहेत. यामुळेही बीटकॉईन मध्ये तेजी दिसत आहे.

करोना नंतर मार्च मध्ये बीटकॉईनचे भाव ४००० डॉलर्सच्या खाली आले होते पण डॉलर कमजोर झाल्यावर बीटकॉईन मध्ये परत तेजी आली. सोन्याच्या किमती घसरल्याने बीटकॉईन अधिक मजबूत बनले कारण गुंतवणूकदार बीटकॉईनकडे वळले. जगातील मोठी अॅसेट मॅनेजमेंट फर्म ब्लॅकरॉकच्या म्हणण्यानुसार सेफ हेवन म्हणून गुंतवणूकदार बीटकॉईनकडे वळले आहेत आणि काही काळात बीटकॉईन सोन्याची जागा घेईल.

इथेरियम, एक्सआरपी, लाईट कॉईन, स्टेलर सारख्या छोट्या क्रिप्टो करन्सीच्या किमती सुद्धा वाढत चालल्या आहेत. बीटकॉईन ही आभासी मुद्रा किंवा डिजिटल करन्सी आहे. ती पाहता येत नाही अथवा तिला स्पर्श करता येत नाही. फक्त इलेक्ट्रोनिक स्वरुपात तिची साठवण करता येते. २००८ मध्ये या करन्सीचा शोध लागला आणि २००९ मध्ये ती लाँच झाली. बीटकॉईनचे सर्वात छोटे चलन सातोशी हे आहे. १० कोटी सातोशी म्हणजे १ बीटकॉईन. या चलनावर कोणताही देश, बँक अथवा अॅथोरिटीचे नियंत्रण नाही. बीटकॉईनची किंमत जगभर सगळीकडे सारखी आहे. भारतात या चलनाला मान्यता नाही.