दानशूरपणामुळे पुन्हा चर्चेत आली मेकेंझी बेजोस

फोटो साभार द हिल

ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचा मालक जेफ बेजोस यांची माजी पत्नी मेकेंझी स्कॉट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी मेकेंझी हेडलाईन्स मध्ये झळकण्याचे कारण चांगले आणि अभिमान वाटावा असे आहे. मेकेंझीने तिच्या संपत्ती मधले ४.२ अब्ज डॉलर्स म्हणजे ३१ हजार कोटी रुपये दान केले आहेत.

करोना काळात जगातील मोठी लोकसंख्या भविष्याच्या चिंतेने ग्रासली आहे. मेकेंझी स्कॉटने याच काळात मोठी संपत्ती दान करण्याची इच्छा व्यक्त करून चॅरिटीची घोषणा केली. त्यामुळे ती गरजवंतांसाठी देवदूत बनली आहे. आपल्या ब्लॉग मध्ये मेकेंझी लिहिते,’ करोना मुळे अमेरिकन नागरिकांचे आयुष्य अवघड बनले आहे आणि त्यांचा संघर्ष वाढला आहे. या नुकसानीचा सर्वाधिक फटका महिला, अश्वेत आणि गरिबांना बसला आहे. या काळात श्रीमंतांची संपत्ती वाढली आहे यामुळे गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.’

मेकेंझी आणि जेफ यांचा घटस्फोट जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. त्यातून मेकेंझीला २.६० लाख कोटीची रक्कम मिळाली आणि ती एकदम जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट झाली होती. आज घडीला तिची संपत्ती ४ लाख कोटी आहे. पण संपत्ती आणि भाग्य या ऐवजी मेकेंझीने चॅरिटीची निवड केली असून गेल्या काही महिन्यात तिने दिलेले हे दुसरे मोठे दान आहे. गेल्या महिन्यात तिने ११६ संस्थांना १२ हजार कोटी दान दिले होते तर यावेळी ३८४ संस्थांना ३१ हजार कोटी दिले आहेत.