पुण्याच्या तरुणांनी ‘विजय दिवस’च्या पार्श्वभूमीवर सुमद्रात फडकवला 321 फूट लांब तिरंगा


पुणे – 16 डिसेंबर हा दिवस भारतात ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारताने याच दिवशी 1971 मध्ये पाकिस्तानचा युद्धात पराभव केला होता. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) पश्चिम पाकिस्तानपासून या युद्धानंतर वेगळा झाला होता. 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी 16 डिसेंबर रोजी भारतीय लष्करासमोर गुडघे टेकून आत्मसमर्पण केले होते. 41 युवकांनी मंगळवारी (15 डिसेंबर) याच विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात 321 फूट लांब तिरंगा फडकवला.

तारकर्ली मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात हा कारनामा पुण्याच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी केला आहे. समुद्रात 321 फूट लांब ध्वज फडकवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सर्वांनी यावेळी भारत माता की जय अशी घोषणाबाजी केली. याबाबत माहिती देताना डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव म्हणाले की, भारतीयांसाठी 16 डिसेंबर हा दिवस अभिमानाचा दिवस आहे आणि यामुळेच सुमद्रात एवढा मोठा तिरंगा फडकवण्याचा आम्ही विचार केला. दरम्यान डोंगर ग्रुप याचा व्हिडिओ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात देशाच्या स्वातंत्र्यानंतर बरीच युद्धे झाली होती, पण 1971 आणि 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध सर्वांनाच माहिती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947, 1965, 1971 आणि 1999 मध्ये युद्ध झाले आहे.