उत्तर प्रदेशात देशातील पहिले कोरोना लसीकरण; रद्द केल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या


लखनऊ: देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशात त्यादृष्टीने हालचालींना वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील एक परिपत्रक उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून जारी करण्यात आले आहे. यामध्ये लसीकरण मोहीम 20 डिसेंबर ते 21 जानेवारी या काळात राबवली जाणार असल्याचा उल्लेख आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य आवश्यक असल्यामुळे पूर्ण विचाराअंती सर्व सरकारी कर्मचारी, नर्सेस, कंत्राटी कर्मचारी आणि रोजंदारी कामगारांच्या सुट्ट्या 31 जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

याबाबत चिकित्सा आणि स्वास्थ्य विभागाचे अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस साठवण्याबरोबरच ती कशाप्रकारे द्यायची याबाबतचे व्यवस्थापन सध्या सुरु असून संबंधित कर्मचाऱ्यांना त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मास्टर्स ट्रेनर्स तयार आहेत. हे मास्टर्स ट्रेनर्स आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस कशाप्रकारे द्यायची, याचे प्रशिक्षण देतील.