पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाची रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी


नवी दिल्ली – भाजप आणि एनडीएने बिहारनंतर आता आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली असतानाच या निवडणुकीच्या रणांगणात आपला पक्षही उतरणार असल्याचे रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारेल याची भविष्यवाणी देखील त्यांनी केली आहे.

आठवले यांनी याबाबत एक ट्विट केले असून आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पश्चिम बंगालच्या दहा विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे. तृणमूल काँग्रेसचा आगामी निवडणुकीत पराभव होईल तर एनडीएचे सरकार बनेल.

रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष हा एनडीएचा भाग असून स्वतः आठवले मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी म्हणजेच भाजपसाठी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मित्रपक्षांनाही मदतीसाठी घेऊ शकते. आठवले यांनी याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले असून ‘एनडीए’चाच विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.