प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत घोटाळा : UIDAI च्या माजी प्रमुखांच्या खात्यात जमा झाले पैसे


नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’अंतर्गत सातवा हफ्ता जमा करण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना या योजनेअतंर्गत वर्षभराच्या कालावमधीमध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये पाठवले जातात. पण या योजनेमध्ये आता फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या योजनेसाठी पात्र नसणाऱ्या व्यक्तींच्या खात्यावर अनेक ठिकाणी पैसे जमा झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी न करणाऱ्यांच्या खात्यांमध्येही पैसे जमा झाल्याची प्रकरणे आता समोर येत आहे. यात विशेष बाब म्हणजे आता थेट आधारकार्डांसंदर्भातील सर्व कामकाज पाहणाऱ्या युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी प्रमुख राम सेवक शर्मा यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भातील वृत्त द क्विंटने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एका वर्षामध्ये तीनवेळा शर्मा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पीएम सन्मान निधी अंतर्गत एकूण सहा हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. या योजनेसाठी शर्मा यांनी आपले नाव नोंदवलेले नसतानाही या योजनेअंतर्गत त्यांचा खाते क्रमांक नोंदवण्यात आला आहे. राज्य सरकार यासाठी जबाबदार असून पैसे पाठवण्यापूर्वी त्यांनी खाते क्रमांकाशी संबंधित कोणतीही तपासणी केली नसल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.

माझ्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत दोन हजार रुपयांचा निधी तीन हफ्त्यांमध्ये जमा झाल्याची माहिती शर्मा यांनी दिली. हे पैसे शर्मा यांच्या नावाने असणाऱ्या ज्या खात्यामध्ये जमा झाले आहेत ते खाते ८ जानेवारी २०२० रोजी सुरु करण्यात आले आहे. नऊ महिने हे खाते सुरु राहिले आणि नंतर २४ सप्टेंबरला ते बंद करण्यात आले. या खात्यानुसार उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणून शर्मा यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. द क्विंटच्या हवाल्याने मनी कंट्रोलनेही यासंदर्भातील वृत्त दिले आहे.आपल्या नावाने खाते सुरु करण्यात आले आहे हे शर्मा यांना समजले तेव्हा त्यांनीच बँकेला यासंदर्भातील माहिती दिली. पण त्यावर बँकेकडून काहीही उत्तर आले नाही. पण शर्मा यांच्या नावाने बँकेने सुरु करण्यात आलेले खाते बंद केले. या योजनेसाठी मी पात्र नसल्याचे शर्मांनी स्पष्ट केले आहे.