ममता बॅनर्जींनी केला बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान – ओवेसी


नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असून त्याकरिता भाजपकडून राज्यभर विविध रॅलींचे आयोजन केले जात आहे. तर, भाजपासह विरोधी पक्षांवर ममता बॅनर्जी देखील जोरदार निशाणा साधताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी प्रचार रॅली दरम्यान भाजपवर निशाणा साधत म्हटले की, असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे भाजप प्रयत्न करत आहे.

ओवेसी यांनी ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. असा कुणी आजपर्यंत जन्माला आलेला नाही, की जो पैशांनी ओवेसीला विकत घेऊ शकेल. त्यांचे आरोप निराधार असून त्या सध्या अस्वस्थ आहेत. आपल्या पक्षाची त्यांनी काळजी केली पाहिजे, कारण त्यांचे अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत. बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा त्यांनी अपमान केला आहे.

तर, ममता बॅनर्जींनी जलपाईगुडी येथील सभेत बोलताना अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने हैदराबादची एका पार्टीला (एमआयएम) पकडले आहे. त्यांना भाजप पैसे देते व मतांचे ते विभाजन करण्याचे काम करतात. हे बिहार निवडणुकीत सिद्ध झाले असल्याचे म्हटले होते.