चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांना पक्षवाढीसाठी दिला ‘हा’ सल्ला


मुंबई: राज्यातील गाव-खेड्यातील राजकारण ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तापले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षवाढीसाठी खास सल्ला दिला आहे. जर आपला पक्ष राज ठाकरे यांना वाढवायचा असेल तर त्यांनी राज्यभर दौरे करायला हवे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आपण फिरलो तरच आपली ताकद किती आहे, याचा अंदाज आपल्याला येत असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा आणखी एक सामना या निवडणुकींच्या निमित्ताने रंगणार आहे. त्यातच या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तसे आदेशच दिले असल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातही आपला जनाधार वाढवण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना राज्यभर फिरण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांना पक्ष संघटन मजबूत करायची असेल आणि पक्ष वाढवायचा असेल तर तुम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरावे लागेल. फिरल्याने, लोकांशी संवाद साधल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढल्याने आपल्याला नेमका किती जनाधार आहे, जनतेचा किती प्रतिसाद आहे, याचा अंदाज येतो, असे पाटील पुढे म्हणाले.

मनसेचा महापालिका निवडणुकांमध्ये किती प्रभाव असेल, हे सांगता येऊ शकते, पण ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होईल, हे सांगता येणार नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पाटील म्हणाले. भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत त्यांना विचारले असता आम्ही मनसेशी युती करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजप आमदारांची या निवडणुकीसंदर्भात बैठक झाली असून काही महत्त्वाच्या सूचना त्यांना करण्यात आल्यातेही पाटील म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकष ग्रामपंचायत निवडणुकीला लावता येणार नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.