हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांची बायोपिक बनणार

फोटो साभार झी न्यूज

भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्यावर बायोपिक बनत असल्याची अधिकृत घोषणा केली गेली आहे. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी कंपनीतर्फे हा चित्रपट तयार केला जाणार असून त्याची घोषणा सोशल मिडिया वर एका पोस्टच्या माध्यमातून केली गेली आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट अजून ठरलेली नाही असे समजते.

सोशल मिडियावरील पोस्ट मध्ये ‘ १५०० गोल, ३ ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स, भारताची शान असलेले मेजर ध्यानचंद यांची कहाणी , असे म्हटले गेले आहे. ध्यानचंद यांच्यावर बायोपिक बनविण्याचा आनंद खूप मोठा असल्याचेही यात नमूद केले गेले आहे.

विशेष म्हणजे सरत्या वर्षात करोना मुळे नवीन चित्रपट आले नाहीत, शुटींग होऊ शकले नाही तरी नवीन वर्षात अनेक नामवंत खेळाडूंच्या बायोपिक येणार आहेत. जगजेत्ता बुद्धिबळ पटू ग्रांडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बायोपिकचे काम २०२१ मध्ये सुरु होत असल्याची घोषणा केली गेली असून हा चित्रपट २०२१ अखेरी किंवा २०२२ च्या सुरवातीला प्रदर्शित होईल असे समजते. प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांच्यावरील बायोपिक २०२१ मध्ये रिलीज होत असून त्यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

भारताची फुलराणी साईना नेहवाल हिची बायोपिक पुढील वर्षात येईल त्याचे शुटींग मागेच सुरु झाले आहे. यात साईनाची भूमिका परिणीती चोप्रा करत आहे.