भारतात लाँच करण्यात आले व्हॉट्सअप पे


मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay Beta भारतात उपलब्ध आहे. पण हे परवानगी न मिळाल्यामुळे अधिकृत लाँच करण्यात आले नव्हते. पण भारतात आता व्हॉट्सअप पे लाँच करण्यात आले आहे. या अॅपचे लाँचिंग गेल्याच महिन्यात झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. मार्क झुकरबर्ग यांनी डिजिटल इंडिया या प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना रिलायन्स इंडियाचे प्रमुख मुकेश अंबानींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने परवानगी दिल्यानंतर काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. त्यातच भारतात गेल्याच महिन्यात व्हॉट्सअप पे लाँच केल्याची माहिती मार्क झुकरबर्ग यांनी दिली. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याशी पार्टनरींग फॉर डिजिटल इंडियाद्वारे झुकरबर्ग यांनी संवाद साधला. त्यावेळी झुकरबर्ग यांनी भारतात व्हॉट्सअप पे लाँच केल्याचे सांगत, केवळ युपीए कार्यप्रणाली आणि 140 बँकांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले असून असे प्रयोग करायला भारत हा प्रधान्यक्रमाने पहिला देश ठरतो, असेही झुकरबर्ग यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, भारतात WhatsApp Payment कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 400 मिलियन युजर्सला सेफ ट्रान्जक्शन करण्यात मदत करु शकते, असे व्हॉट्सअॅप पे च्या प्रवक्त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्याचबरोबर WhatsApp ची मालकी असलेल्या फेसबुकने गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यामुळे व्हॉट्सअप पे अॅपवर WhatsApp आणि Jio मिळून काम करत आहेत.