यामुळे ठप्प झाल्या होत्या युट्यूब आणि जीमेलसह गूगलच्या सर्व सेवा; गुगलचे स्पष्टीकरण


मुंबई : सोमवारी संध्याकाळी लोकप्रिय सर्च इंजिन गूगलची ई-मेल सेवा जीमेलसह अनेक सेवा ठप्प झाल्यामुळे युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. गूगलच्या वतीने ‘गूगल वर्कस्पेस स्टेटस डॅशबोर्ड’ वर संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी देण्यात आलेल्या माहितीनुसार, ठप्प झालेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पुढे सांगण्यात आले की, आम्हाला आशा आहे की, सर्व युजर्ससाठी लवकरच सेवा पूर्ववर्त करण्यात येतील. सांगण्यात आलेली वेळ ही अंदाजे देण्यात आली आहे. या वेळेमध्ये बदलही होऊ शकतात.

गूगलकडून सेवा ठप्प होण्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. स्पष्टीकरण देताना गूगलने म्हटले की, आज 3:47AM पीटीवर इंटरनल स्टोरेज कोटाबाबत जवळपास 45 मिनिटांपर्यंत ऑथेन्टिकेशन सिस्टमची समस्या आली. यादरम्यान, यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान ऑथेन्टिकेशन सिस्टममध्ये आलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. सर्व सेवा पूर्ववर्त करण्यात आल्या आहेत. यूजर्सना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. तसेच घडलेल्या प्रकाराचा अभ्यास करुन भविष्यात पुन्हा असे होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

याआधी ऑगस्टमध्ये गूगल सेवा खंडीत झाल्या होत्या. गूगलची ईमेल सेवा ‘जी-सूट’च्या मुख्य पानावर लोकांना सोमवारी संध्याकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी एक मेसेज दिसला. आम्हाला माहिती आहे की, गूगल सेवा ठप्प झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचमुळे यूजर्स जीमेलचा वापर करु शकत नाहीत.

गूगलने जारी केलेल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, याव्यतिरिक्त गूगलच्या इतर सेवा गूगल कॅलेंडर, गूगल ड्राईव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांच्यावरही परिणाम झाला आहे. नेटवर्कशी निगडीत समस्या दाखवणाऱ्या ‘डाऊन डिटेक्टर’ने देखील दाखवले की, गूगलच्या जीमेल आणि यूट्यूब यांसारख्या सेवा खंडीत झाल्या आहेत. गूगल सेवा खंडीत झाल्यानंतर ट्विटरवर लोकांनी आपला राग व्यक्त केला. ट्विटरवर #गूगल आणि #गूगलडाऊन ट्रेंडमध्ये होता. जवळपास 13 लाखांहून अधिक ट्विट हे हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते.