प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण ब्रिटनच्या पंतप्रधानानी स्वीकारले


नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा केली होती. त्यांनी जॉन्सन यांना त्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारले असून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

आपल्यासाठी ही मोठ्या सन्मानाची बाब असल्याचे ब्रिटनने म्हणत जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. ब्रिटनमध्ये यावर्षी जी ७ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.

पंतप्रधानपदाची सूत्रे बोरिस जॉन्सन यांनी हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रिटनचे पंतप्रधान ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले आहे. दरम्यान, ब्रिटनला भारतासोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

दहशतवाद आणि कट्टरताबादामुळे निर्माण झालेल्य़ा समस्यांवर चर्चा एस. जयशंकर आणि डॉमनिक राब यांच्या चर्चेदरम्यान करण्यात आली. अफगाणिस्तानातील परिस्थिती, आखाती देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीची आम्ही समीक्षा केली. कोरोना महासाथीनंतर भारत आणि ब्रिटन पुन्हा एकदा आर्थिकरित्या रुळावर येण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक दृढ करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.