अजित पवारांचे भर सभागृहात मुनगंटीवारांना खुले चॅलेंज; म्हणाले मग मला पाडून दाखवा


मुंबई : महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा शाब्दिक सामना हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील पाहण्यास मिळाला. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सभागृहात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने पुरवणी मागण्या सादर केल्या. सुधीर मुनगंटीवार यावर बोलायला उभे राहिले होते. त्यांनी यावेळी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा आडकाठी आणत असेल, तो पुन्हा निवडून येत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यानंतर समोरच बसलेले अजित पवार म्हणाले की, मी स्वीकारले तुमचे आव्हान, मला पाडूनच दाखवा, असा खुमासदार टोला लगावला. सभागृहात अजित पवारांच्या टोल्यानंतर एकच हश्शा पिकली.

पण, सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांच्या खुमासदार विधानावर गुगली टाकली. मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. आम्ही हे करून दाखवले आहे, असे काय करता दादा, आमचे तुमच्यावर खूप प्रेम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले असता सभागृहात पुन्हा एकदा हश्शा पिकला.

तसेच राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे होत नसल्यामुळे मी मेल मागवले. मंत्रालयात जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाला आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे एवढे मेल आले आहेत की, संगणकालाही रडू फुटले असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच, कोरोनाकरता तुम्ही 50 कोटी आज देता. ज्या लोकांनी जीवाची पर्वा न करता काम केले, जे मृत्युमुखी पडले त्यांना 10 दिवसांत अनुकंपा धोरणावर नोकरी दिली पाहिजे, अशी मागणी केली होती, तुम्ही काय केले. तुम्ही केंद्राला पत्र पाठवले.

जो येईल तो उठून म्हणून केंद्राने मदत करावी म्हणतो, येथे असे का रडता ? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. केंद्र काय मदत करत नाही का? खोटे बोला पण सर्वांनी मिळून बोला अशी नवी म्हण आली आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.