पैशाच्या तंगीमुळे बोरीस जॉन्सन सोडणार पंतप्रधानपद

फोटो साभार नवभारत टाईम्स

ब्रेग्झीट प्रक्रिया पूर्ण झाली की ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांच्या एका जवळच्या सहकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मिडीयाला सांगितले आहे. ते म्हणाले पंतप्रधानपदी मिळणारा अपुरा पगार ही बोरीस यांची मुख्य समस्या आहे. या पगारात त्यांना कुटुंबाचा खर्च आणि गरजा भागविणे परवडत नाही. त्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.

करोना मुळे सर्व जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर कोट्यवधी लोकांचे पगार कमी झाले आहेत. पण याचा चटका फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर राष्ट्रप्रमुखाना सुद्धा बसतो आहे. बोरीस सुद्धा त्याला अपवाद नाहीत.

पंतप्रधान होण्यापूर्वी बोरीस एका वर्तमानपत्रात कॉलम लिहीत असत आणि त्यासाठी त्यांना महिना २२ लाख रुपये मिळत. पंतप्रधान झाल्यापासून त्याचे वेतन वर्षाला १ कोटी ४३ लाख म्हणजे महिन्याला साधारण १२ लाख रुपये आहे. म्हणजे अधिक जबाबदारीची जागा घेऊन पगार कमी अशी त्यांची अवस्था आहे. शिवाय या पगारातून पेन्शनपोटी काही रक्कम कापली जाते. बोरीस यांचे राहणीमान खर्चिक आहे त्यामुळे या पगारात त्यांना घरखर्च चालविणे अवघड बनले आहे.

पूर्वी बोरीस यांनी केवळ दोन भाषणे देऊन दीड कोटीची कमाई केली होती असेही समजते. जगात सर्वाधिक वेतन सिंगापूरच्या पंतप्रधानांना मिळते. त्यांना वर्षाला ११ कोटी रुपये मिळतात. त्याखालोखाल हॉंगकॉंग प्रमुखाला ४ कोटी, स्वित्झर्लंड पंतप्रधानांना साडेतीन कोटी तर भारताच्या पंतप्रधानांना महिना दोन लाख म्हणजे वर्षाला २४ लाख रुपये वेतन मिळते.