नव्या राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी ५ तासात तयार होते व्हाईट हाउस

फोटो साभार अमर उजाला

अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाउस नव्या राष्ट्रपतीच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. जुन्या राष्ट्रपतींचा मुक्काम १९ जानेवारी पर्यंत व्हाईट हाउस मध्ये असतो आणि नवे राष्ट्रपती २० जानेवारीला येथे मुक्काम करतात अशी येथील प्रथा आहे. विशेष म्हणजे या काळात व्हाईट हाउसच्या सफाईला फक्त पाच तास मिळतात आणि त्या वेळेतच कोणतीही व्यावसयिक संस्थेची मदत न घेता येथील कर्मचारी संपूर्ण इमारतीची स्वच्छता करतात.

ही साफसफाई करताना नव्या अध्यक्षांच्या आवडीचा आणि गरजांचा विचार केला जातो. किचन पासून सेमिनार रूम तयार करण्याचे सर्व काम ५ तासात केले जाते. एस्क्सप्लोरिंग द व्हाईट हाउस या पुस्तकाच्या लेखिका केट अंडरसन यांनी सीएनएन ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

नवीन राष्ट्रपतींना पुस्तके, कपडे अगदी टूथब्रश सुद्धा जागेवर मिळेल अशी काळजी घेतली जाते. यावेळी व्हाईट हाउसच्या साफसफाईला थोडा अधिक वेळ लागले असा अंदाज आहे कारण कोविड १९ मुळे सखोल स्वच्छता करून सर्व इमारत जंतूविरहित केली जाणार आहे. राष्ट्रपती भवन मध्ये असलेल्या सामानाची यादी अगोदरच नवीन राष्ट्रपतींना पाठविली गेली आहे.

या भव्य इमारतीत १३२ खोल्या, ३५ बाथरूम्स, ४१२ दरवाजे, १४७ खिडक्या, ८ जिने, तीन लिफ्ट असून या सहा मजली इमारतीला दोन बेसमेंट आहेत. दोन मजले सार्वजनिक वापरासाठी आहेत तर बाकी चार मजले अध्यक्षांसाठी असतात. या इमारतीत कायमस्वरूपी पाच शेफ आहेत आणि एकावेळी १४० लोकांच्या भोजनाची व्यवस्था होऊ शकते. आयर्लंड मध्ये जन्मलेल्या जेम्स होवन यांनी या इमारतीचे डिझाईन केले होते आणि १७९२ ते १८०० या आठ वर्षात ही इमारत बांधून पूर्ण झाली होती.