दीड कोटीची शेळी- सारजा

फोटो साभार पत्रिका

गाई, म्हशी, रेडे यांच्या किमती लाखोंमध्ये असतात याची कल्पना बहुतेकांना असेल. अगदी बकरी ईदला कुर्बानी करायचे बकरे सुद्धा लाखो रुपयात खरेदी केले जातात. पण एका शेळीची किमत दीड कोटी असेल यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. बरे ही शेळी विदेशी नाही तर अस्सल भारतीय आहे. सांगली जिल्यातील आटपाडी तालुक्यातील माडग्याळी जातीची ही शेळी बाबू मेटकरी यांच्या मालकीची आहे.तिचे नाव आहे सारजा.

जत तालुक्यात या जातीच्या शेळ्या मेंढ्या अधिक प्रमाणात आहेत आणि त्या तालुक्यातील माडग्याळ गावावरून त्यांना तेच नाव पडले आहे. या भागात नेहमीच शेळ्या मेंढ्या बाजार भरतो आणि मोठी उलाढाल होते. आसपासच्या राज्यातून येथे मेंढपाळ, पशु पालन करणारे खरेदीसाठी येतात. या जातीच्या शेळ्या उत्तम गुणवत्तेचे मटण मिळविण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच त्यांना ब्रिडींग साठी मोठी मागणी असते.

मेटकरी यांच्या मालकीची शेळी प्रत्येक बाजारात ठळकपणे नजरेत भरते. या जातीच्या शेळ्यांचा आकार मोठा असतो. मेटकरी यांच्याकडे २०० शेळ्या मेंढ्या आहेत. एका जत्रेत सारजा शेळीला ७० लाख रुपयांना मागणी आली हे पाहून मेटकरी थक्क झाले. पण त्यांना सारजा विकायची नाही. सारजा त्यांच्यासाठी लकी आहे. त्यांनी तिची किंमत दीड कोटी ठरविली आहे. विशेष म्हणजे सारजाला या भागात लोक् कौतुकाने मोदी म्हणतात. सर्व निवडणुका जिंकून मोदी जसे पंतप्रधान बनले तशी सारजा कोणत्याही बाजारात नेली तरी तिचाच दिमाख अधिक असतो आणि तिच्यासाठी मोठी किंमत मोजायची ग्राहकाची तयारी असते.