तमिळनाडूत ओला करणार जगातील मोठा इलेक्ट्रिक दुचाकी प्रकल्प सुरु
फोटो साभार युट्यूब
वेबबेस्ड टॅक्सी सेवा ओला तामिळनाडू येथे जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक दुचाकी वाहन प्रकल्प सुरु करत असल्याची घोषणा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी केली आहे. यासाठी ओला २४०० कोटींची गुंतवणूक करत असून तमिळनाडू सरकारबरोबर या संदर्भात नुकताच सहकार्य करार केला गेला आहे.
अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या निमित्ताने भारतात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प सुरु केला जात असून कारखान्याचे काम पूर्ण होताच १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता सुरवातीला वर्षाला २० लाख स्कुटरची असेल. ओला येत्या काही महिन्यात इलेक्ट्रिक स्कुटरची पहिली रेंज लाँच करत असून त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली गेली आहे.
अग्रवाल म्हणाले या कारखान्यात तयार होणाऱ्या स्कुटर भारताबरोबरच युरोप, आशिया, लॅटीन अमेरिका आणि जगभरातील बाजारात पाठविल्या जाणार आहेत. हा कारखाना अतिशय आधुनिक असून ओला पहिली इलेक्ट्रिक स्कुटर जानेवारीच्या सुरवातीला लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत हा दुचाकीचा सर्वात मोठा बाजार आहेच पण दुचाकी बाजारात आशिया खंडाचा वाटा ८० ते ९० टक्के आहे.