रिपब्लिकच्या CEOच्या पोलिस कोठडीत 15 डिसेंबरपर्यंत वाढ


मुंबई – मुंबई किल्ला कोर्टाने 15 डिसेंबरपर्यंत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदानी यांना पोलिस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. रिपब्लिक टीव्ही ग्रुप न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. आजच खानचंदानी यांच्या जामिनासाठी याचिका देखील दाखल करण्यात येणार आहे. विकास खानचंदानीला फेक टीआरपी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले खानचंदानी हे 13 वे व्यक्ती असून सहाय्यक उपाध्यक्ष आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विकास अटक होणारे रिपब्लिक टीव्हीचा दुसरे अधिकारी आहेत.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अटक झाली असल्याची माहिती देताना सांगितले की, दोनवेळेस खानचंदानी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता आणि त्यांची भूमिका रिपब्लिक टीव्हीचे डिस्ट्रीब्यूशन हेड घनश्याम सिंह यांच्या चौकशीदरम्यान समोर आली होती. तपास अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, खानचंदानी यांच्याविरोधात आमच्याकडे प्रत्यक्ष पुरावे आहेत आणि पहिलेच अटकेत असलेला आरोपी घनश्याम सिंहसोबत त्यांची लिंकही मिळाली आहे.

तपासकर्त्यांनी सांगितले की, एक इंटरनल व्हॉट्सअप ग्रुपचा खानचंदानी भाग होता. ज्यामध्ये LCN (लॉजिकल चॅनल नंबर) वर चर्चा होत होती. क्राइम ब्रांचने न्यायालयात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये उल्लेख केला होता की, चॅनलच्या अधिकाऱ्यांनी केबल ऑपरेटर आणि मल्टी सिस्टम ऑपरेटर्ससोबत मिळून रिपब्लिक टीव्हीला ड्यूल लॉजिकल चॅनल नंबर (LCNs) किंवा दोन फ्रीक्वेंसीवर चालवले. जे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या दिशा-निर्देशांचे उल्लंघन आहे.