प्रताप सरनाईक यांच्याकडून कंगना राणावत आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव


मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. त्याचबरोबर सरनाईक यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमांना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: दिली. आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 सुरु झाले असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार प्रताप सरनाईक यांनी या वेळी सांगितले की, माझ्या विरोधात काही लोकांनी जाणीवपूर्वक अपप्रचार केला. खोट्या बातम्या परसवल्या. माझी आणि कुटुंबीयांची राज्य आणि देशपातळीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर माझ्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा केला. राफेलचे कागदपत्रे मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागिदारी आणि काहींनी विदेशात निर्माण केलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडल्याचे म्हटले. परंतू, हे सर्व धादांत खोटे असल्याचे म्हणत प्रताप सरनाईक यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

पाकिस्तानसारख्या देशाचे स्वत:चेच जगात क्रेडीट नाही त्या देशाचे क्रेडीट कार्ड घेऊन मी काय करणार? असा सवालही उपस्थित केला. दरम्यान, काही प्रसारमाध्यमांनी कंगना राणावत यांनी केलेल्या ट्विटच्या आधारे माझ्याबद्दल दिशाभूल करणारे वृत्त दिले. माझा हक्कभंग प्रस्ताव त्यांच्याबाबतही दाखल करुन घ्यावा, अशी विनंती आपण अध्यक्षांना केल्याचे सरनाईक म्हणाले.

दरम्यान, मी ईडीच्या चौकशीला सामोरे गेलो आहे. मी ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना योग्य उत्तरे दिली आहेत. या पुढेही काही चौकशीसाठी आवश्यक असेल तर मला कळवा. प्रताप सरनाईक दोन तासात ईडी कार्यालयात दाखल होईल, असे आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचेही प्रताप सरनाईक म्हणाले.