कोरोना नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या नाईट क्लब्सवर महापालिकेची कारवाई


मुंबई – आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पार्ट्या, एकत्र भेटणे, नाईट क्लबमध्ये जाणे या सगळ्या गोष्टींचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची या सगळ्या पब, नाईट क्लब्सवर करडी नजर आहे. असे असतानाच कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यामुळे मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

मोठ्या प्रमाणावर कोरोना नियमावलीचे उल्लंघन मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेल्या बॉम्बे अड्डा या नाइट क्लबमध्ये केले जात असल्याची बाब लक्षात आली. पार्टी करणाऱ्या २७५ व्यक्तींनी मास्क घातलेला नसल्यामुळे या प्रकरणी ३० हजारांचा दंड बॉम्बे अड्डा या नाईट क्लबला ठोठावण्यात आला.

बॉम्बे अड्डा या नाईट क्लबवर ज्या प्रमाणे कारवाई झाली तशीच कारवाई दादरमधील प्रीतम या हॉटेलवरही करण्यात आली. पहाटे एकच्या सुमारास महापालिका अधिकाऱ्यांनी प्रीतम हॉटेलला अचानक भेट दिली. तेव्हा १२० जणांनी मास्क घातला नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे कोरोनाचे नियम ज्यांनी मोडले त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. अशीच कारवाई भगवती हॉटेलवरही करण्यात आली.

मुंबई महापालिकेने १० डिसेंबरला झालेल्या एका कारवाईत लोअर परळ येथील एका क्लबविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम या क्लबमध्येही मोडले गेले होते. मुंबई महापालिकेने शहरातील सगळ्या नाईट क्लब आणि पब्स यांना सक्त ताकीद दिली होती की क्लब उघडले असले तरीही कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन सहन केले जाणार नाही. ते होत असल्यामुळे आता मुंबई महापालिका नाईट क्लब आणि पब्स यांच्याविरोधात कारवाई करत आहे.