मागील दशकापासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही प्रेक्षकांचे निख्खळ मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील लोकप्रिय दयाबेन आणि जेठालाल ही जोडी अनेकांच्या पसंतीची बनली आहे. विशेष म्हणजे ही जोडी केवळ देशातच नाही तर विदेशातही लोकप्रिय असल्याचे म्हटले जाते.
‘तारक मेहता..’ला रामराम ठोकणार जेठालाल?
मागील दोन वर्षांपासून या मालिकेत दयाबन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी दिसलेली नाही. त्यानंतर आता जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशीदेखील ही मालिका सोडणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. दिलीप जोशींनी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत धडाकेबाज अभिनय करत अनेकांची मने जिंकली असल्यामुळे त्यांना सध्या अनेक ऑफर्स येत असल्याचे दिसून येते.
दिलीप जोशी यांनी अलिकडेच एका युट्यूब वाहिनीवर याविषयीचा खुलासा केला. दिलीप जोशी यांचे आयुष्य तारक मेहता या मालिकेने पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे त्यांचे या मालिकेसोबत एक खास नाते तयार झाले आहे. पण त्यांना याच काळात अनेक नवीन ऑफर्सदेखील येत आहेत.
अनेक नवनवीन ऑफर्स सध्या मला येत आहेत. पण या ऑफर्स मी नाकारल्या आहेत. कारण माझे आयुष्य तारक मेहता.. या मालिकेमुळे बदलले आहे. माझे संपूर्ण वेळापत्रक खूप व्यस्त असते. कारण मी तारक मेहताची दररोज शुटींग करतो, असे दिलीप जोशी म्हणाले. माझी स्वप्न या मालिकेमुळे साकार झाली असल्यामुळे मी नवीन ऑफस स्वीकारत नाही. या मालिकेमुळे मला लोक दिलीप जोशी ऐवजी जेठालाल म्हणूनच जास्त ओळखतात, असे ही त्यांनी सांगितले.
केवळ मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही दिलीप जोशी यांनी काम केले आहे. सलमान खान, अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.