नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. नड्डा यांना ज्यामध्ये कोणत्याही दुखापत झाली नाही, पण भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्य नेते जखमी झाले होते. आता या पार्श्वभूमीवर कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आता झेड दर्जाची सुरक्षा कैलाश विजयवर्गीय यांना प्रदान करण्यात आली असून, त्याचबरोबर त्यांच्या बुलेटप्रुफ गाडी देखील असणार आहे. या अगोदर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत. दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरादार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवाय, कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कैलाश विजयवर्गीय यांची सुरक्षा या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आल्याचे दिसत आहे.
बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणूक असल्याने तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगालमध्ये प्रभारी असल्याने सातत्याने ते विविध ठिकाणी जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही भाजपसाठी महत्वाचा आहे. भाजपने नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरादार टीका केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दिल्लीत देखील बोलावून घेण्यात आले आहे.