बिल गेट्स यांनी व्यक्त केली आगामी चार ते सहा महिन्यात परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची भीती


नवी दिल्ली : कोरोनाने मागील अनेक महिन्यापासून जगभरात हाहाकार माजवला असून जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये या कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आणि या व्हायरसमुळे लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. अद्यापपर्यंत तरी या रोगावर कोणतेच प्रभावी औषध उपलब्ध नसल्यामुळे या रोगाची तीव्रता वाढली आहे. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जणू सर्व जगच थांबले होते.

पण मागील महिन्याभरात अनेक दिलासादायक वृत्त हाती येत असून लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश येत आहे. लवकरच भारतीय बनावटीच्या दोन लस देखील उपलब्ध होणार आहेत. अशातच, आता आणखी दिलासादायक वृत्त हाती येत आहे. आता कोरोनावरील औषध देखील शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी याच पार्श्वभूमीवर रविवारी एका मुलाखती दरम्यान कोरोनाच्या साथीमुळे आगामी चार ते सहा महिन्यात परिस्थिती अधिक चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी गेट्स यांची संस्था सध्या काम करत आहे. अमेरिकेवर ओढावलेली कोरोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

सीएनएनला एक विशेष मुलाखत बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष असणाऱ्या बिल गेट्स यांनी दिली. बिल गेट्स यांनी यामध्ये या साथीच्या कालावधीचे पुढील चार ते सहा महिने परिस्थिती अंत्यत वाईट होऊ शकते. आयएचएमआयच्या (इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मैट्रिक्स अँड एवेल्यूएशन) अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. आपण मास्क घातला नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर मृत्यूचा हा आकडा नियंत्रणामध्ये आणू शकतो, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेत मागील काही आठवड्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे, मृत्यूचे आणि रुग्णालयामधील अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. अमेरिका ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळेल, असे मला वाटत असल्याचे मतही बिल गेट्स यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे गेट्स यांनी कोरोनासारखी मोठी साथ येईल, अशी भविष्यवाणी २०१५ मध्येच केली होती.