एकदा तरी त्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा मोदीजी…; प्रकाश राज यांचा सल्ला


नवी दिल्ली – गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर केलेल्या तीन नव्या शेतकरी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू असून विरोधी पक्षांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ एकत्र येत भारत बंद पाळला होता. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गावोगावी फिरून भाजपच्या चुकीच्या धोरणांबाबत सभा घेणार आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांसाठी आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत असताचा अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केले आहे.


शेती विषयक कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण रद्द करा. तुम्ही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल तळगाळातील लोकांचे नक्की काय मत आहे हे समजून घ्या आणि शेतकऱ्यांचा विश्वास जिंका, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. त्यांनी याच ट्विटमध्ये शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी #JustAsking #FarmersProstests #FarmLaws #WeUnitedForFarmers हे हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.