ही आहे जगातील सर्वात थंडगार शाळा

फोटो साभार ग्लोबल न्यूज

करोनामुळे जगभरातील बहुतेक देशात शाळा कॉलेज बंद असताना जगातील सर्वाधिक थंडगार शाळा म्हणून ओळख असलेल्या सायबेरियाच्या ओएमयाकोन शाळेत मात्र दूरवरच्या गावातूनही विद्यार्थी येत आहेत. जगात सर्वधिक थंड भागात असलेली ही शाळा तापमान उणे ५२ डिग्रीच्या खाली उतरले तरच ११ वर्षाखालील विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची परवानगी देते.

आपण थोडी थंडी वाढली की लगेच स्वेटर, शाली, कानटोप्या बाहेर काढतो. लहान मुलांना नखशिखांत गरम कपड्यात गुंडाळतो, पण या भागात नेहमीचे तापमानच मुळी उणे ५० डिग्री असते. येथे वर्षभर बर्फ असते तरीही येथील नागरिक घराबाहेर पडून नेहमीची कामे करतात आणि विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या शाळेत येतात. केवळ गावातलेच नाही तर जवळपासच्या गावातून सुद्धा विद्यार्थी येतात. कधी त्यांच्या सोबत पालक असतात तर कधी कुत्री. थंडी इतकी मरणाची असते की कडेकोट बंदोबस्त करूनही विद्यार्थ्याच्या डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा बर्फ जमते.

ही शाळा १९३२ साली सुरु झाली आहे. म्हणजे आता ती ८८ वर्षांची आहे. मुळात ओएमयाकोन गावात पोहोचण्यासाठीच अडचणींचे डोंगर पार करावे लागतात. येथे पोस्ट आणि बँक सुविधा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. ही शाळा स्टॅलीनच्या काळात सुरु करण्यात आली असे समजते.