जुहीचा झुमका शोधणाऱ्याला मिळणार बक्षीस

प्रत्येकाच्या आवडीची एखादी खास वस्तू असते. कुणाची अंगठी असेल, कुणाचे घड्याळ असेल, कुणाची पर्स असेल किंवा कुणाची आणखी काही वस्तू असेल. या वस्तूविषयी खास लगाव असतो आणि अशी वस्तू हरवली तर जीव चुटपुटतो याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला सध्या याच भावनेतून जात आहे. जुहीने तिचा हिऱ्याचा खास झुमका हरविला आहे आणि तो शोधून देणाऱ्याला ती बक्षीस देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुही दुबईला जात होती तेव्हा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी गेट नंबर ८ वर एमीरेटस कौंटर वर चेक इन करून सिक्युरिटी चेक मध्ये जात असताना तिचा कानातील एक झुमका कुठेतरी पडला. जुहीने या संदर्भात सोशल मीडियावर तिच्या झुमक्याचा फोटो शेअर केला असून मदतीची याचना केली आहे. ती लिहिते गेली १५ वर्षे रोज मी हे हिऱ्याचे झुमके वापरते आहे. त्यातील एक विमानतळावर पडला. कुणाला सापडला तर मला फार आनंद होईल. कृपया पोलिसांना याची माहिती द्या. मी इनाम देईन. जुहीची ही पोस्ट सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाली आहे.