असे असेल चंद्रावरचे गाव

केवळ कवी कल्पनेत असलेले चांदोबा मामाचे गाव आत्ता प्रत्यक्षात हकिकती मध्ये येणार आहे. युरोपीय स्पेस एजन्सीने चंद्रावरच्या गावाचे फोटो शेअर केले असून येत्या १० वर्षात हे गाव प्रत्यक्षात आलेले असेल असे म्हटले आहे. स्पेस एजन्सीचे सल्लागार एडेन काऊली म्हणाले हे गाव वसविताना चंद्रावरच्या मातीचा वापर करता येणार आहे. या मातीमुळे १९० डिग्री तपामानात व रेडिएशनपासून बचाव होऊ शकणार आहे.

चांदोबाच्या गावात, चार मजली सिलिंडरच्या आकाराच्या इमारती असतील. खालचा मजला स्टडी सेंटर आणि मंगळ मिशन साठी लाँच पॅड म्हणून वापरला जाईल. चंद्रावरच्या या कायमस्वरूपी बेसचा वापर अन्य देश सुद्धा करू शकतील. खरोखरच हे गाव प्रत्यक्षात येणार का हा प्रश्न आता राहिलेला नाही तर हे गाव कधी तयार होईल हा प्रश्न आहे.

चंद्रावरील मातीपासून १ मीटर रुंदीच्या भिंती तयार होतील. या घराच्या आत अंतराळवीर राहतील. इमारती साठी लागणारी माती रोबो एकत्र करतील. या मातीत काचेचे कण आहेत. थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने या मातीच्या विटा बनविल्या जातील. या विटा सूर्यप्रकाशात वाळविल्या जाणार आहेत. अमेरिकेच्या नासाने २०२४ मध्ये चंद्रावर माणूस पाठविण्याची तयारी केली असून या मिशन मध्ये प्रथम महिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे.