देशात जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात; अदर पुनावालांचे मोठे संकेत


पुणे – देशवासियांना लवकरच कोरोना लसीकरणावरून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून लसीकरणाबाबत मोठे संकेते ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिले आहेत. कोरोना लसीच्या आपातकालीन वापराला डिसेंबरच्या शेवटी परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की एसआयआयला कोरोना लसीचे लायसन या महिन्याच्या शेवटी मिळू शकते. पण, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची एस्ट्राझेनेकासोबत मिळून ही लस विकसित केली आहे.

भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही सिरम कोरोना लस बनवत आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस केंद्र सरकारला खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे. देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे.

पुनावाला याबाबत पुढे म्हणाले की, ही कोरोना लस व्यक्तीचे कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच संक्रमण थांबविण्यास सक्षम आहे की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. याची काहीच कल्पना आपल्याला देखील नाही. जेव्हा कोरोना लस देशातील २० टक्के लोकसंख्येला मिळेल तेव्हाच लोकांमध्ये विश्वास परतेल. पुढील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोना लस उपलब्ध होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.