छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षांचे बलात्काराच्या मुद्यावर धक्कादायक वक्तव्य


नवी दिल्ली – देशात सातत्याने महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतो. एकीकडे बलात्काराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच एका धक्कादायक वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असून बहुतांश मुली स्वतःहून आधी संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्कार केल्याचा आरोप पुरुषांवर करतात, असे वक्तव्य छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केले आहे.

किरणमयी नायक छत्तीसगढमधील बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या, एखादी विवाहित व्यक्ती जर एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवे की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, असे संबंध जेव्हा तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात, असे नायक म्हणाल्या.

माझा अल्पवयीन मुलींना सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचे कुटुंब, मित्र आणि तुमचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुले होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणे अवघड होत असल्याचे नायक म्हणाल्या. बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. महिला/मुलींना मी आवाहन करते की, त्यांनी आधी नाते समजून घ्यावे. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल, असा सल्ला त्यांनी दिला.

संबंध सहमतीने ठेवल्यानंतर ते नाते तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. आयोगाचे जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे प्रयत्न असल्यामुळे आम्ही महिला व पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग असल्याचेही नायक म्हणाल्या.

Loading RSS Feed