टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानीला अटक


मुंबई : मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई केली असून रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे. आतापर्यत 13 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, या आधीही विकास खानचंदानी यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज विकासला मुंबई पोलिसांनी अटक केली.

अर्णब गोस्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेतून केली होती. त्याचबरोबर सीबीआयकडून या प्रकरणी चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. त्यावर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर 7 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार देत ही याचिका फेटाळून लावली होती. तसेच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

या याचिकेमध्ये गोस्वामी यांनी सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला.