भारताची आगामी सहा-आठ महिन्यांत कोट्यावधी नागरिकांच्या लसीकरणाची तयारी


नवी दिल्ली : औषध नियंत्रकांकडून कोरोना प्रतिबंधासाठी किमान तीन कंपन्यांच्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी आढावा घेतला जात असतानाच, कोट्यावधी लोकांचे लसीकरण येत्या ६ ते ८ महिन्यांत करण्याच्या मोहिमेची तयारी भारताने सुरू केली आहे.

३० कोटी भारतीयांना कोरोना प्रतिबंधक लसीचे ६० कोटी डोस देण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा तैनात करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. यात आरोग्यसेवेतील कार्यकर्ते, ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे प्राधान्य गटातील लोक आणि बहुव्याधी असलेले ५० वर्षांखालील लोकांचा समावेश आहे. लसीची २ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यानच्या तापमानावर साठवणुकीची (कोल्ड स्टोअरेज) व्यवस्था सरकारने सुरू केली असल्याचे असे निती आयोगाचे सदस्य आणि कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले.

सीरम, भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि स्पुटनिक ५ या ४ कंपन्यांना सामान्य शीत साखळीची आवश्यकता असल्यामुळे या लसींच्या बाबतीत काहीच अडचण येणार नसल्याचे मला वाटते, असे पॉल यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेली सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही एस्ट्राझेनेका- ऑक्सफर्ड कोव्हिशिल्ड लशीचे यापूर्वीच मोठय़ा प्रमाणावर उत्पादन आणि साठवणूक करत आहे; तर भारत बायोटेक व झायडस कॅडिला या भारतीय कंपन्या त्यांची स्वत:ची लस विकसित करत आहेत.

दरम्यान, औषध नियंत्रकांकडून लवकरच लसीच्या आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी मिळण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे सरकारने म्हटले आहे. तथापि, अद्याप या लसीची किंमत व त्यांची खरेदी याबाबत औपचारिक बोलणी व्हायची असल्याचे पॉल यांनी सांगितले.