आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बंद केला दिल्ली जयपूर महामार्ग


नवी दिल्ली – पंजाबमधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकांविरोधात पुकारलेले आंदोलन चिघळले असून आता दुसऱ्या ठिकाणांवर आंदोलकांनी आपला मोर्चा केंद्रीत केला असून शेतकऱ्यांनी राजस्थानातील शाहजहांपूर येथे हरियाणा सीमेजवळ हायवे बंद केला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवली आहे. शेतकऱ्यांची कृषि विधेयक रद्द करा ही मुख्य मागणी असून त्यासाठी सरकार तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हे आंदोलन गेल्या 18 दिवसांपासून सुरू असून चर्चेच्या अनेक फेऱ्या सरकार आणि आंदोलक संघटनांमध्ये झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. सरकार नव्या विधेयकांमध्ये दुरूस्त्या करण्यास तयार आहे. पण आंदोलक त्यासाठी तयार नसल्यामुळे आंदोलन चिघळले आहे.

आधीच त्यांनी पंजाब सीमेवर एक महामार्ग रोखून धरला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली, पण कोंडी फुटली नाही. दरम्यान पंजाबमधील भाजपच्या नेत्यांशी शहा यांनी आंदोलन आणि राज्यातील परिस्थितीबाबत आज चर्चा केली. पंजाबमधील कारागृहांचे DIG लक्षमिंदर सिंह जाखड यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.