५ किलो सिलिंडरचे आता ‘छोटू’ हेच अधिकृत नाव

फोटो साभार वेब दुनिया

एलपीजी सिलिंडर वितरणातील देशातील बडी कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशनने ५ किलो वजनाच्या सिलिंडरचे नाव अधिकृतरित्या ‘छोटू’ करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. आयओसीच्या अधिकृत विक्री केंद्रांवर हा छोटू आता सहज उपलब्ध होणार आहे. वजनाला हलका असल्याने तो कुठेही नेता येतो शिवाय अन्य सिलिंडर प्रमाणे त्यासाठी रिक्षा वा अन्य वाहनांची गरज नाही. अगदी हातात धरून सुद्धा तो नेणे सहज शक्य आहे.

दहा वर्षापूर्वी गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे लागत असत. शिवाय नोंदणी केल्यावर सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असे. आजकाल सिलिंडर सहज उपलब्ध आहेत. व्यावसायिक वापरासाठी १९ किलोचे तर घरगुती वापरासाठी १४.२ किलोचे सिलिंडर पुरविले जातात. पण तरी स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल अश्या मोठ्या वर्गासाठी सिलिंडरची गरज आहे हे लक्षात घेऊन ५ किलोचे सिलिंडर ५ ऑक्टोबर २०१३ मध्ये आणले गेले होते. पण हा सिलिंडर संपला की सहज रिफील करून घेणे अवघड होते. त्यावेळी चार महानगरात त्याची विक्री पेट्रोल पंपावर केली जात असे.

आता मात्र हा छोटू केवळ ओळखपत्र दाखवून ग्राहकांना घेता येणार आहे. पेट्रोल पंप, इंडेन एलपीजी, अगदी किराणा दुकानात सुद्धा हे सिलिंडर उपलब्ध करून दिले गेले आहेत. आकाराने छोटा म्हणून त्याचे नाव छोटू पडले होते पण आता आयओसीने त्याचे हेच नाव अधिकृत केले आहे.