शरद पवार झाले ८० वर्षांचे, मोदींनी दिल्या शुभेच्छा
फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स
पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांनी वयाची ८० वर्षे आज पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतानाच ईश्वर तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष देवो अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे येथे झाला होता. राजकारणात उतरल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुखमंत्री ते केंद्रात कृषी, संरक्षण मंत्री अश्या अनेक महत्वाच्या पदांचा भार यशस्वी पणे सांभाळला आहे. त्यांच्या सहस्त्रचंद्र दिनाच्या निमित्ताने आज महाशरद ऑनलाईन मंच सुरु केला जात असून या मंचाच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना गरजेच्या वस्तू मोफत पुरविल्या जाणार आहेत असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. या ऑनलाईन मंचाचे अॅप मार्च पर्यंत लाँच केले जात आहे असेही ते म्हणाले.
मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग व्यक्तींना ब्रेल किट, श्रवण यंत्रे, कृत्रिम अवयव, बॅटरी संचालित व्हील चेअर अशी अनेक उपकरणे आवश्यक असतात. ही उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत पण अनेकांना ती विकत घेणे परवडत नाही. यासाठी हा मंच स्थापन केला असून या साठी दानकर्त्यांची मदत घेतली जाणार् आहे. अनेक सामाजिक संस्था, खासगी उद्योग, उद्योगपती, वैयक्तिक दानशूर व्यक्तींनी यासाठी तयारी दाखविली आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना आवश्यक असलेली उपकरणे मोफत दिली जाणार आहेत.