… तर काँग्रेसचे पानिपत टळले असते: मुखर्जीच्या आत्मकथनातील सूचक भाष्य

नवी दिल्ली: दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पानिपताला काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्याचवेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा आपण अधिक चांगला पर्याय असल्याचा एक प्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचेही त्यांनी आपल्या ‘द प्रेसिडेन्शिअल ईअर्स’ या आत्मकथनात सूचित केले आहे. तसे झाले असते तर सन २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत टळले असते, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडल्याचे त्यांनी आत्मवृत्तात नमूद केले आहे.

आपण पंतप्रधान झालो असतो तर पक्षाचे पतन होण्यापासून वाचवू शकलो असतो, या थिएरीशी पूर्णतः सहमत आहोत असे नाही. मात्र, आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसविल्यानंतर पक्षाची दिशा भरकटली, असे मुखर्जी यांनी पुस्तकात नमूद केले आहे. पक्षाध्यक्ष सिनिया गांधी या पक्षांतर्गत घडामोडींना समर्थपणे हाताळू शकत नव्हत्या आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सदनातील अनुपस्थितीमुळे पक्षनेतृत्व आणि खासदार यांच्यात सुसंवाद राहिला नाही, असे मुखर्जी यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलनाही त्यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. डॉ. सिंग हे राज्यकारभार करण्यापेक्षा आघाडीतील पक्षांना चुचकारण्यातच व्यग्र राहिले. त्याचा परिणाम सरकारच्या कार्यक्षमतेवर झाला. मोदी यांनी मात्र आपल्या पहिल्या कार्यकाळात कारभारावर आपला एकछत्री अंमल कायम ठेवला. या काळात सरकार, संसद आणि न्यायसंस्था यांच्यात सुसंवाद असल्याचे दिसून आले. हा संवाद ते दुसऱ्या कार्यकाळात वृद्धिंगत करू शकतात का; किमान टिकवून ठेवू शकतात का; हे येणार काळच ठरवेल, असे मुखर्जी यांनी नमूद केले आहे.