कृषी कायद्यांमुळे होणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ: पंतप्रधान
नवी दिल्ली: कृषी कायद्यांमुळे शेतकरी आणि कृषी आधारित उद्योग यांना जोडण्याचे काम केले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदतच होणार आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’च्या ९३ व्या वार्षिक संमेलनाला पंतप्रन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले.
जेव्हा एखाद्या क्षेत्राची वाढ होते त्यावेळी त्याचा परिणाम इतर क्षेत्रांवरही होत असतो. मात्र, त्यासाठी या क्षेत्रांमध्ये भिंती नव्हे तर त्यांना जोडणारे पूल असावे लागतात. उदोगांमध्ये सेतू उभारण्याऐवजी भिंती उभारल्या तर कोणताच उद्योग अपेक्षित प्रगती करू शकणार नाही, असे मोदी यांनी नमूद केले.
शेती आणि त्याच्याशी संबंधित कृषी पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, साठवणूक सुविधा, शीतगृह साखळी अशा उद्योगांमध्ये अनावश्यक भीती घातल्या होत्या. नव्य कायद्यांमुळे या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकणार आहे. कृषी क्षेत्रात नवी गुंतवणूक आकृष्ट होऊ शकते. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीत वृद्धीच होणार आहे, असा दावा मोदी यांनी केला. बाजारसमित्यांप्रमाणेच इतर ठिकाणीही आपली उत्पादने विकण्याची मुभा मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगांनी ग्रामीण आणि निमशहरी भागात गुंतवणूक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यापुढील काळात याच क्षेत्रात प्रगतीच्या अधिक संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत खाजगी क्षेत्राने कृषी क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.