काँग्रेसला धुळीस मिळविण्याचा व्यापक कट: निरुपम

मुंबई: काँग्रेस पक्षाला देशभरात धुळीस मिळविण्याचा कट दिल्लीपासून मुंबईपर्यंत आखला गेला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविण्याची कंडी पिकवणे हा त्या कटाचाच एक भाग आहे, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्लीपासून मुंबईपर्यंत कटकारस्थाने त्याची व्याप्ती केवळ राहुल गांधींना विरोधापुरती मर्यादित नाही तर ते  काँग्रेसला संपविण्याचे कारस्थान आहे. संपुआचे नेतृत्व पवार यांच्याकडे सोपविण्याची अफवा, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आलेले ‘ते’ २३ पानी  पत्र, राहुल गांधी यांच्या राजकीय नेतृत्वात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप हा सर्व या कारस्थानाचा भाग आहे, असा दावा निरूपम यांनी केला.

संपुआला प्रभावी नेतृत्व मिळावे यासाठी पवार यांच्याकडे सूत्र सोपविण्यात येणार असल्याचे वृत्त गुरुवारी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्वरित या वृत्ताचा इन्कार केला असला तरी याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच राहिले आहे विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.