अमेरिकेने देखील दाखवला फायझर लसीच्या आपातकालीन वापराला हिरवा कंदील


वॉशिंग्टन – फायझर कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे साईडइफेक्ट ब्रिटनमध्ये समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या समितीने या लसीच्या आपातकालीन लसीकरणाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे अमेरिकी सरकारही आता या लसीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना समितीने सांगितले की, ही लस गुण कोरोनाचे धोके कमी करते

पहिल्यांदा ब्रिटनने फायझरला परवानगी दिल्यानंतर बहरिन हा दुसरा देश ठरला होता. फायझरने त्याआधीच अमेरिकेकडेही परवानगी मागितली होती. भारताकडेही याच कंपनीने आपातकालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. आता अमेरिकेनेही हिरवा कंदील दाखविल्यामुळे फायझरला मोठे यश मिळाले आहे. फायझरने ही लस जर्मनीच्या बायोएनटेक सोबत विकसित केली आहे.

अमेरिकेत गुरुवारी तब्बल आठ तास जनसुनावणी झाल्यानंतर एफडीएची लस आणि जैविक उत्पादने सल्लागार समितीने (व्हीआरबीपीएसी) फायझरच्या लसीच्या लसीकरणाचा प्रस्ताव पास केला. याबाबत व्हीआरबीपीएसीचे सदस्य आणि फिलाडेल्फीयातील बालरोगतज्ज्ञ पॉल ऑफिट यांनी सांगितले की, फायझरच्या लसीचा एक स्पष्ट फायदा आहे, दुसरीकडे आमच्यासमोर सैद्धांतिक जोखीम आहे. हे लाभ कोरोनाचे संभावित धोके कमी करतात.

आणखी एक सदस्य बालरोगतज्ज्ञ ओफर लेवी यांनी सांगितले की, हा एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. ब्रिटन आणि बहरिन या दोन देशांनी लसीकरणाला परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एफडीएने फायझरची लस चाचण्यांमध्ये आणि अमेरिकेच्या नियमावलीमध्ये यशस्वी ठरल्याचे म्हटले होते.