अन् हातात काठीत घेऊन बिबट्याच्या शोधात निघाले रोहित पवार


अहमदनगर: कर्जतसह करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश देण्यात आला असला तरी तो बिबट्या पोलिस आणि वन अधिकऱ्यांना सापडत नाही. उलट त्याचे हल्ले सुरूच असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण व्याप्त आहे. ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत शोध मोहीमेत काही काळ सहभागी झाले होते. बिबट्या रात्रीही हाती लागला नसला तरी ग्रामस्थांशी पवारांनी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सीमा भागातील गावांत उपद्रव सुरू आहे. त्या भागातील तीन जणांचे आतापर्यंत बळी गेले आहेत. अनेक जखमी झाले असून काहीजण थोडक्यात बचावले देखील असल्यामुळे निर्माण झालेली घबराट लक्षात घेऊन या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश वनविभागाने दिला आहे. त्यानुसार बंदुका घेऊन वनविभागाचे अधिकारी फिरत आहेत. पण अद्याप त्यांच्या हाती बिबट्या लागला नाही. तो अनेक वेळा गुंगारा देत पळून गेला आहे. तो कधी उसाच्या शेतात असल्याचे तर कधी कोणावर हल्ला केल्याची माहिती येते, वनविभागाचे कर्मचारी त्यावर तेथे धाव घेतात, पण तो निघून गेलेला असतो.
https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1085034945293580
ग्रामस्थ आणि वनअधिकारी रात्रीही फिरत असतात. कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आमदार रोहित पवार आले होते. तेव्हा शेजारच्या तालुक्यातील हल्ल्याची एक घटना ताजी असल्याचे कळाल्यामुळे पवार यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांसोबतच करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी रात्रीच्या गस्तीवरील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधून मोहिमेची माहिती घेतली.

त्यांना या कामात प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून स्वत: हातात काठी घेतली आणि वन विभागाच्या पथकात काही काळ गस्तीत आमदार पवार यांनी सहभाग नोंदविला. त्यांनी करमाळा तालुक्यातील वांगी, सांगवी येथे जाऊन ग्रामस्थांशीही संवाद साधला. काहीही करून बिबट्याला तातडीने पकडावे किंवा मारावे व या संकटात आमची सुटका करावी, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली.