राम कदमांची राज्यपालांकडे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी


मुंबई – भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे बंगालमधील भाजप नेतेही ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत आहे. भाजप आमदार राम कदम याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही यावेळी राम कदम यांच्या सोबत उपस्थित होते. याबाबत माहिती देताना राम कदम यांनी ट्विट करत म्हटले होते, की पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी.

त्याआधी ममता बॅनर्जी यांचा राम कदम यांच्या नेतृत्वात खारमध्ये निषेध करण्यात आला. पश्चिम बंगालमधील नागरिकदेखील यावेळी त्यांच्यासोबत होते. काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून यावेळी ‘ममता हटाव बंगाल बचाव” अशा घोषणा देण्यात आल्या.