थुकरटवाडीत पहिल्यांदाच एकत्र येणार पंकजा मुंडे, रोहित पवार आणि सुजय विखे


झी मराठीवरील प्रसिद्ध अशा थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार असून कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे. राजकीय मैदानातील दोन दिग्गज कुटुंब असलेले मुंडे व पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. अशावेळी राजकीय फटाकेबाजी थट्टामस्करीतूनही होणार नाही अशी शक्यताच नाही.

पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीसुद्धा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. एक खेळ या सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये खेळण्यात आला. हा खेळ होता रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा आणि त्या वस्तूंमध्ये राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचाही समावेश होता. धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती योगायोगाने घड्याळावर पडली. त्यानंतर तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू, असा हास्य टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.

रोहित हा सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचे काम करत असल्याचा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच त्याला रोहित पवारांनीही मजेशीर प्रत्युत्तर दिले. घरच्यांना माहित असते, आपल्या माणसांसाठी काय चांगले असल्याचे रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.