गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मुंबईच्या तरुणाची ‘आय लव्ह यू’ लिहून आत्महत्या


इंदूर : आपल्या नावावर वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी चार कंपन्या, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद असलेला आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या मुंबईच्या एका व्यावसायिक तरुणाने इंदूरमध्ये आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आल आहे. पंकज कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. पंकजने इंदूरच्या ‘ग्लोडी पॅलेस’ नावाच्या एका बड्या हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांना पंकजच्या रुममधून दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली आहे. त्याने या डायरीत ‘आय लव्ह यू नीलम’ असेही लिहिलेले पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यासोबतच पंकजने आपल्या डायरीत आपल्या बँक खात्यात एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही केला आहे. पोलिसांनी ‘सुसाईड नोट’च्या आधारे पुढील चौकशी सुरू केली आहे. या आत्महत्येमागे प्राथमिकदृष्ट्या प्रेमप्रकरणातून आणि तणाव ही कारणे असू शकतात, असा पोलिसांचा कयास आहे.

मृत्यूपूर्वी पंकजने आपल्या कुटुंबाला अनेक मॅसेज केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्याने यामध्ये आपल्या कामाच्या तणावाबद्दल काही उल्लेख केला होता. मी कामाच्या तणावामुळे मृत्यूला सामोरे जात असून यात कुणाचाही दोष नसल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

पंकजचा चुलत भाऊ बेनी प्रसाद याच्या म्हणण्यानुसार, पंकज कांबळे मुंबईतून इंदूरला काँग्रेस आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी गेला होता. पंकजने या विवाहाच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु, पंकज तब्येत अचानक बिघडल्याचे सांगत विवाहसोहळ्यातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रुममध्ये पंकजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पंकज मुंबईतील सांताक्रूझ भागात राहत होता. पंकजने केवळ २८ व्या वर्षी आपल्या नावावर चार कंपन्या स्थापन केल्या होत्या. तसेच त्याने एक ट्रेनिंग अकॅडमीही सुरू केली होती. प्लेअर बार टेंडर म्हणूनही पंकजने काम केले होते. केवळ १५ मिनिटांत १२० पद्धतीचे मॉकटेल तयार करत त्याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डलाही आपल्या नावाची नोंद घ्यायला भाग पाडले होते.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी पंकजने आपल्या खांद्यावर घेतली होती. नागपूरमध्ये त्याची आई आणि लहान भाऊ राहतात. पंकजच्या आत्महत्येची बातमी पोलिसांकडून मिळाल्यानंतर कुटुंबिय इंदुरला दाखल झाले. त्याने देशभरातील अनेक इव्हेंट हाताळले होते. सोशल मीडियावर पंकज कांबळेचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.

Loading RSS Feed