विश्वनाथन आनंद देणार बुद्धीबळ प्रशिक्षण

पाच वेळा बुद्धीबळ जगजेत्ता विश्वनाथन आनंद यांनी होतकरू बुद्धीबळपटूना प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी स्थापन केली आहे. या अकादमीसाठी वेस्टब्रीज कॅपिटल बरोबर करार केला आहे. या अकादमीचे नामकरण वेस्ट ब्रीज आनंद अॅकॅडमी असे केले गेले आहे. या अकादमीत देशातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना जागतिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वतः आनंद या खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

पहिल्या बॅच मध्ये पाच खेळाडूंची निवड केली गेली आहे. त्यात १५ वर्षीय आर प्रागनंदा, त्याची बहिण १९ वर्षीय आर वैशाली, १६ वर्षीय निहाल सरीन, १५ वर्षीय रौनक साधवानी आणि १४ वर्षीय डी गुकेश यांचा समावेश आहे. दरवर्षी या प्रकारे योग्य उमेदवार खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल असे समजते.

या खेळाडूंना विश्वचँपियन रँकिंग मध्ये जागा मिळावी या पद्धतीने त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. विश्वनाथन आनंद या संदर्भात माहिती देताना म्हणाला, गेल्या २० वर्षात बुद्धिबळात खूप प्रगती झाली आहे. देशात अनेक गुणवान खेळाडू आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले तर जगातील टॉप १० खेळाडू मध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. त्यातीलच कुणी जागतिक जगजेत्तेपद सुद्धा मिळवू शकेल असा विश्वास आहे.