फर्स्ट लेडी मेलेनियाची सामान आवराआवरी सुरु

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरल्याचे अजूनही डोनल्ड ट्रम्प मान्य करण्यास तयार नसले तरी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी मात्र व्हाईट हाउस मधील खासगी सामानाची आवराआवरी सुरु केली असल्याचे समजते. ट्रम्प परिवार फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए- लिगो या पामबीचवरील अलिशान प्रॉपर्टीवर शिफ्ट होणार आहे. ट्रम्प यांचे नवे ऑफिस कदाचित येथेच सुरु केले जाईल असे समजते.

ट्रम्प यांनी निवडणुकीत हार मान्य केलेली नसली तरी त्यांच्या कुटुंबियांनी ट्रम्प यांच्या या दाव्याला समर्थन दिलेले नाही. ट्रम्प यांचे जावई जरेड कुशनर यांनी तर अगोदरच व्हाईट हाउस सोडून फ्लोरिडा येथील घरी शिफ्टींग केले आहे. सीएनएनच्या एका बातमीनुसार फर्स्ट लेडी मेलेनिया सध्या ट्रम्प यांच्या हां ला हां करत असल्या तरी त्यांनी व्हाईट हाउस सोडण्याची तयारी सुरु केली आहे.

मेलेनीया यांच्या विश्वासू मार्सिया कॅली यांच्या कडे शिफ्टींगची जबाबदारी सोपविली गेली आहे. व्हाईट हाउस मधील ट्रम्प कुटुंबाच्या मालकीच्या खासगी सामानाच्या याद्या तयार झाल्या आहेत. यातील काही सामान फ्लोरिडा मध्ये रवाना केले गेले आहे. मेलेनिया आता स्वतःच्या घरी जाण्यास उत्सुक आहेत. फ्लोरिडा येथे राहून मेलेनिया याना मुलगा बॅरन याच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची इच्छा आहे असेही समजते.