शिर्डीतील वातावरण ड्रेसकोडमुळे चिघळणार? तृप्ती देसाई पुण्याहून रवाना


शिर्डी – भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात आक्रमक झाल्या असून शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानुसार पुणे येथून शिर्डीसाठी तृप्ती देसाई रवाना झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्यामुळे लावण्यात आला आहे.

जो बोर्ड शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत लावण्यात आला आहे. आज आम्ही तिथे जाऊन त्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. लवकरात लवकर तो बोर्ड हटवला जावा, अन्यथा आम्ही लढा आणखी तीव्र उभारणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाले आहेत. त्यांना आम्ही शिर्डीच्या सीमेवरच रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे तृप्ती देसाई आणि ब्राह्मण महासंघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिरे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून भक्तांनी ठिकठिकाणी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. दर्शनासाठी शिर्डीमधील साई मंदिरही खुले करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भक्त गर्दी करत आहेत. शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

सभ्य पोषाख भक्तांनी मंदिरात येताना परिधान करावा, असे आवाहन शिर्डी संस्थानकडून करण्यात आले आहे. भक्त गेल्या काही दिवसांपासून छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.