सिंधू संस्कृतीत होत होते मांसाहाराचे सर्वाधिक सेवन; संशोधनातून माहिती आली समोर


हिस्सार : जगातील सर्वात प्राचीन मानवी संस्कृती अशी ओळख सिंधू संस्कृतीची असून आता याच सिंधू संस्कृतीबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. शाकाहाराऐवजी या संस्कृतीमध्ये आहारात मांसाहाराला सर्वाधिक प्राधान्य होते. त्याचबरोबर या मांसाहारामध्ये गोमांसाचे सर्वाधिक सेवन केले जात असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. बुधवारी ही माहिती ‘जर्नल ऑफ अर्कियॉलॉजिकल सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाली असून या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती अशी ओळख असलेल्या सिंधू संस्कृतीबाबत अद्याप सर्व बाबी समोर येऊ शकलेल्या नाहीत. अद्यापही याबाबत संशोधन सुरुच असून आता याच संशोधनातूनच सिंधू संस्कृतीच्या आहाराबाबत नवी माहिती समोर आली आहे. तेथील लोकांची मांसाहाराला सर्वाधिक पसंती होती, त्यातही ते गोमांसाला सर्वाधिक प्राधान्य देत होते, हे तेथे आढळलेल्या काही अवशेषांवरुन दिसून येत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

हे संशोधन केंब्रिज विद्यापीठात शिकत असलेल्या अक्षेता सुर्यनारायणन या पीएचडी स्कॉलर विद्यार्थीनीने केले असून तीने या बाबींचा उल्लेख आपल्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये केला असून ही माहिती ‘लिपिड रेसिड्युसेस इन पॉटरी फ्रॉम दी इंडस सिव्हिलायझेशन इन नॉर्थवेस्ट इंडिया’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे.

अक्षेता सध्या हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या खाण्याच्या सवयी काय होत्या, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मातीच्या भांड्यांमध्ये लिपिड या एका स्निग्ध पदार्थाचे अवशेष या संशोधनादरम्यान आढळून आले आहेत. यावरुन तेथील लोक त्याकाळी मांसाहार पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उदा. डुक्कर, गुरे-ढोरे, म्हैस, मेंढी आणि बकऱ्यांचे मांस यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर यात दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.

उत्तर पश्चिम भारतात हा सर्व भाग होता, जो आज हरयाणा आणि उत्तर प्रदेशात आहे. या अभ्यासाचे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे, बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. रविंद्र एन. सिंह त्याचबरोबर केंब्रिज विद्यापीठाचे मरिअम कुबा, ऑलिव्हर ई क्रेग, कार्ल पी. हेरॉन, तमसीन सी ओ कोनेल, कॅमेरॉन ए पॅट्री हे सर्व संशोधक सहलेखक आहेत.

याबाबत माहिती देताना अक्षेता सूर्यनारायण यांनी सांगितले की, सिंधू संस्कृतीत यापूर्वी खाद्यपदार्थाच्या सवयींविषयी बरेच अभ्यास झाले असले तरी त्या काळात घेतल्या जाणाऱ्या पिकांवर या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पण आता जो विषय सूर्यनारायण यांच्या पीएचडीचा आहे. त्यामध्ये सिंधु संस्कृतीमध्ये कुठले अन्न शिजवले जायचे याचा तिथे सापडलेल्या लिपिड नावाच्या एका स्निग्ध पदार्थाच्या अवशेषांच्या अभ्यासातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

पाळीव प्राण्यांपैकी गुरे, म्हशींचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे तेथील उत्खननात आढळून आले आहे. तेथे या प्राण्यांची सरासरी ५० ते ६० टक्के हाडे आढळून आली आहेत. तसेच १० टक्के मेंढ्या, बकऱ्यांची हाड आढळून आली आहेत. गोवंशाच्या हाडांच्या उच्च प्रमाणावरुन सिंधू संस्कृतील लोकांची गोमांसांला अन्न म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. तसेच बकऱ्याचे मांस त्याला पूरक होते, असे या अभ्यासात म्हटले आहे.