मंगळावर जाणाऱ्या मस्क यांच्या SpaceX रॉकेटचा स्फोट


नवी दिल्ली – बुधवारी लँडिंग दरम्यान टेक्सास येथील तळावर प्रसिद्ध उद्योगपती एलान मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केलेल्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला. या रॉकेटच्या स्फोटाचे लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्डींग झाले असून यशस्वी उड्डाण स्टारशिप रॉकेटने केले पण त्याचा लँडिंग दरम्यान स्फोट झाला. मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने या १६ मजली स्टारशिप रॉकेटची चंद्र तसेच मंगळापर्यंत माणसे आणि १०० टनापर्यंत सामान वाहून नेण्यासाठी निर्मिती केली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

स्टारशिप एक स्वयंचलित रॉकेट असून या रॉकेटचा लँडिंग पॅडला स्पर्श करताना स्फोट झाला व सर्वत्र एकच आगीचे लोळ उठले. ४१ हजार फूटापर्यंतची उंची गाठण्याचे लक्ष्य टेस्ट फ्लाईट दरम्यान ठरवण्यात आले होते. यामध्ये प्रथमच स्पेसएक्सने नव्याने विकसित केलेल्या रॅप्टर इंजिनचा वापर करण्यात आला. रॉकेटने अपेक्षित उंची गाठली का? ते स्पेसएक्सने स्पष्ट केले नाही.

इंधन टाकीवरील दबाव लँडिंगच्यावेळी कमी असल्यामुळे रॉकेट जास्त गतीने उतरताना स्फोट झाल्याचे दुर्घटनेनंतर एलान मस्क यांनी लगेच ट्विट करुन सांगितले. सर्व आवश्यक डाटा चाचणीमधून आम्ही मिळवला आहे. मस्क यांनी टीमचे अभिनंदनही केले. भविष्यात मंगळ आणि चंद्र मोहिमाच्या दृष्टीने मस्क यांची स्पेसएक्स कंपनी या शक्तीशाली रॉकेटची उभारणी करत आहे. नासाने स्पेसएक्सला स्टारशिप रॉकेटसाठी १३ कोटीपेक्षा जास्त डॉलर्सची मदत केली.

Loading RSS Feed