आतापर्यंत आयपीएलच्या माध्यमातून धोनीने कमावले कोट्यावधी रुपये


नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्टर २०२० मध्ये निवृत्ती घेतलेल्या धोनीने युएईत नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचे नेतृत्व केले. भलेही धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलचे पुढील काही हंगाम धोनी खेळणार आहे. धोनी २००८ सालापासून आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्व करत आहे. धोनी मधील दोन वर्षांच्या काळात पुणे संघाकडून खेळला होता. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सनंतर सर्वात यशस्वी संघ आणि कर्णधार अशी ओळख असलेल्या धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत पार पडलेल्या १३ हंगामाचा इतिहास पाहता धोनीच अजुनही कमाईच्या बाबतीत किंग असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भातील वृत्त इनसाईड स्पोर्ट्स मनी बॉलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत तब्बल १३७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या किमतीत सामनावीर, मालिकावीर व इतर बक्षिसांच्या रकमेचा समावेश नाही. २०० कोटींपर्यंत ही रक्कम जाऊ शकते असा अंदाज आहे. धोनीने २००८ ते २०१० या काळात एकाच बोलीवर चेन्नईचे नेतृत्व केल्यानंतर २०११ साली चेन्नईने धोनीच्या मानधनात वाढ करत त्याच्यासाठी ८.२ कोटी रुपये मोजले. धोनी याच बोलीवर २०१३ पर्यंत चेन्नईचे नेतृत्व करत होता. बीसीसीआयने २०१४ मध्ये संघमालकांना पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत वाढवून १२.५ कोटी एवढी केल्यामुळे धोनीने २०१५ पर्यंत प्रत्येक हंगामात १२.५ कोटी कमावले. त्याला पुणे सुपरजाएंट संघाकडूनही तेवढेच मानधन मिळत होते.

बीसीसीआयने २०१८ चा हंगाम सुरु होण्याआधी पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत १५ कोटी केल्यामुळे धोनीला २०१८ ते २०२० हे तीन हंगाम १५ कोटींचे मानधन मिळत होते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी येतो. रोहितला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना ३ कोटींचे मानधन मिळत होते. रोहितने याच बोलीवर २००८ ते २०१० या काळात डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधीत्व केले. मुंबईने २०११ साली रोहितसाठी ९.२ कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात घेतले. तो याच बोलीवर २०१३ पर्यंत मुंबईकडून खेळत होता. रोहित २०१४ पासून धोनी एवढीच कमाई करत आहे. आतापर्यंत आयपीएलमीधल त्याची कमाई (बक्षिसांची रक्कम वगळून) १३१ कोटींच्या घरात आहे. विराट कोहली या यादीत १२६ कोटींच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे.